रायबरेली (वृत्तसंस्था) – कोरोनामुळे उत्तर प्रदेशमधील आणखी एका भाजप आमदाराचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे रायबरेलीमधील सलोन विधानसभेचे भाजप आमदार आणि माजी मंत्री दल बहादूर कोरी यांचे निधन झाले आहे. एका आठवड्यापूर्वी दल बहादूर कोरी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना लखनौच्या अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले.
राम मंदिर आंदोलनात भाजप आमदार दल बहादूर कोरी यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांना दोनदा तुरुंगवासही भोगावा लागला आहे. त्यांना १९९१ साली पहिल्यांदा विधानसभेचं तिकीट मिळाले. तेव्हा ते पराभूत झाले होते. त्यानंतर ते १९९६ साली सलोन विधानसभेतून निवडून आले आणि राजनाथ सिंह मुख्यमंत्री असताना मंत्रिपद मिळाले. दल बहादूर कोरी यांनी २००४ साली भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये सहभागी झाले. पण त्यांनी २०१४ साली पुन्हा घरवापसी करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २०१७ साली भाजपने त्यांना सलोन विधानसभेचे तिकीट दिले आणि निवडून आले.
तत्पूर्वी उत्तर प्रदेशमुधील ओरैया विधानसभेचे भाजप आमदार रमेश दिवाकर, लखनौ पश्चिम विधानसभेचे सुरेश श्रीवास्तव, बरेलीच्या नवाबगंजमधील आमदार केसर सिंह गंगवार यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. केसर सिंह गंगवार यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने फेसबुकवरून मोदी आणि योगी सरकारवर निशाणा साधला होता.