नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन आणि परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर हे देशाची प्रतिष्ठा कमी करणारी भूमिका घेत आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने मंत्रिपदांवरून हटवावे, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.
करोना संकट गहिरे बनल्याने देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. मात्र, त्याचा दोष जयशंकर यांनी आधीच्या सरकारांना दिला. तर, आरोग्य मंत्री या नात्याने वर्धन कुठलीच कृती करताना दिसत नाहीत. जनतेच्या यातनांची ते टवाळी करत आहेत, असा आरोप कॉंग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला.
जनसामान्यांच्या यातनांशी मोदी सरकारला काहीही देणे-घेणे नाही. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प, पंतप्रधानांचे निवासस्थान आदींवर होणारा कोट्यवधी रूपयांचा अनावश्यक खर्च सरकारने थांबवावा. त्याऐवजी आरोग्य सुविधांच्या सुधारणांसाठी खर्च करावा. करोनाविरोधी लढ्यासाठी भारताला परदेशांतून मदत पुरवली जात आहे.
त्याचा तपशील देऊन सरकारने पारदर्शकता दाखवावी. करोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, असा सवालही त्यांनी केला.