मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका मुलांमध्ये असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही लाट रोखण्यासाठी ‘आशा’सेविकांची भूमिका महत्त्वाची आहे. पालकांनी घाबरून जाऊ नये यासाठी त्यांना आश्वस्त करतानाच कोरोनामुक्त गावासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी. गावातील वस्तीची जबाबदारी घेऊन कोरोनामुक्तीसाठी त्यांना मार्गदर्शन करा, असे आवाहन करतानाच आशा सेविकांनी कोरोनाकाळात केलेल्या कामाबद्दल त्यांना मानाचा मुजरा करतो, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केली.
मुलांमधील कोरोना संसर्ग आणि आशा सेविकांची जबाबदारी या विषयावर बालरोग तज्ञांच्या टास्कफोर्सच्या सदस्यांनी आशा सेविकांशी संवाद साधला. दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी, बालरोग तज्ज्ञांच्या टास्फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, डॉ. विजय येवले, डॉ. समीर दलवाई, डॉ. आरती किणीकर यांच्यासह राज्यभरातील सुमारे ७० हजार आशा सेविका या ऑनलाईन परिषदेत सहभागी झाले होते.
बालरोग तज्ज्ञांच्या टास्कफोर्सने ज्या सूचना केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी करतानाच कोरोना व्यतिरिक्त एखाद्या आजाराची साथ, लक्षणे आढळल्यास त्याची तातडीने माहिती प्रशासकीय यंत्रणेला द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आशा सेविकांना केले. बालकांची काळजी घेण्याबाबत पालकांना मार्गदर्शन करावे त्यांनी घाबरून जाऊ नये यासाठी त्यांना आश्वस्त करण्याचे काम आशा सेविकांनी करावे. कुटुंबातील सदस्यांच्या माध्यमातूनच बालकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी याबाबत नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
कोरोना व्यतिरिक्तही कुपोषणाचे संकट आहे त्याला सामोरे जाताना कुपोषणामुळे बालमृत्यू होणार नाही याकडे लक्ष द्यावे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासनाच्या कोरोना मुक्त गाव मोहिमेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा. गावातील वाड्या वस्त्यांची जबाबदार घेऊन त्यांना कोरोनामुक्तीसाठी मार्गदर्शन करा, असे सांगितले.