जळगाव ( प्रतिनिधी ) – दोन वर्षापासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे अंगणवाड्या बंद होत्या आता मात्र शासन स्तरावरून अंगणवाड्या सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या असून तशा आशयाचे पत्र बालविकास प्रकल्प अधिकारी यांना पाठवण्यात आले आहे
अंगणवाड्या सुरू करण्यासंदर्भात सेविका मदतनीस यांना देखील पूर्वतयारी संदर्भात सूचना दिल्या जात असून पूर्वतयारीला आता सर्वत्र सुरुवात झाली आहे शासनाकडून आदेश प्राप्त होताच अंगणवाड्या सुरू केल्या जातील असे बाल विकास प्रकल्प अधिकारी पदम परदेशी यांनी सांगितले शासनाकडून प्राप्त पत्रामध्ये पुढील निर्देश दिले असून अंगणवाडी केंद्र साफसफाई करुन निर्जुतकीकरण करुन घ्यावेत . ३ ते ६ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांची नोंदणी अद्ययावत करुन घ्यावी . शालेय पूर्व शिक्षण पूर्ववत सुरु करण्यासाठी सर्व शैक्षणिक साहित्याची साफसफाई करून घ्यावी . नियमित दिल्या जाणाऱ्या सेवा लसीकरण , आरोग्य तपासणी , आरोग्य व पोषण आहार शिक्षण , संदर्भ सेवा कार्यान्वित करण्यासाठी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा व अंगणवाडी केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागास निदर्शनास आणून द्यावे व त्याप्रमाणे नियोजन करावे . गरोदर व स्तनदा माता तसेच ३ ते ६ वर्षे वयोगटातील लाभार्थ्याच्या पालकांना अंगणवाडी केंद्र सुरु होणार असल्याचे गृहभेटीवेळी निदर्शनास आणून द्यावे . गरोदर व स्तनदा माता यांच्या बैठका घ्याव्यात . आहार पुरवठा सुरु करण्यासंदर्भात ज्या अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत आहार शिजवला जातो , त्या ठिकाणची भांडीकुंडी स्वच्छ करून ठेवावीत . इंधन साठा उपलब्ध करुन घ्यावा . ज्या ठिकाणी बचत गटांमार्फत गरम ताजा आहराचा पुरवठा करण्यात येतो , त्याठिकाणी बचत गटांना त्यांचे स्वतःचे पाकगृह स्वच्छ व निर्गुतकीकरण करण्याबाबत सूचना निर्गमित कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.