नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अयोध्येतील भव्य राम मंदिर बांधण्यासाठी जानेवारी महिन्यापासून देणगी गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. राम मंदिराच्या देणगीवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपही झाले होते. विश्व हिंदू परिषदेने देशभरात घरोघरी जाऊन देणगी गोळा करण्यास सुरुवात केली होती. आता मात्र घरोघरी जाऊन देणगी गोळा करण्याचे थांब थांबवण्यात आले आहे.

अयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी करण्यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून जोमाने काम सुरू आहे. राम मंदिराच्या बांधकामासाठी देशभरात जनतेकडून देणग्या स्वीकारल्या जात होत्या. घरोघरी जाऊन राम मंदिर उभारणीसाठी देणगी गोळा करण्याची मोहीम बंद करण्यात आल्याची माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून देण्यात आली आहे.
राम मंदिरासाठी घरोघरी जाऊन देणगी गोळा करण्याची मोहीम आता बंद करण्यात आली आहे. नागरिकांना देणगी द्यायची असेल, तर त्यांनी ती ऑनलाई पद्धतीने द्यावी. त्यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकतात. राम मंदिरासमोरील बाजूची जमीन अधिग्रहित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी बोलणी सुरू आहेत. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, आगामी ३ वर्षांमध्ये राम मंदिराची उभारणी पूर्ण होईल, असे राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले.
राम मंदिराच्या उभारणीसाठी गोळा करण्यात आलेल्या देणगीची रक्कम सुमारे अडीच हजार कोटींपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. विश्व हिंदू परिषदेकडून ही माहिती देण्यात आली. यासंदर्भात एक ट्विट विश्व हिंदू परिषदेने केले होते. ०४ मार्चपर्यंत बँकांमध्ये जमा झालेल्या धनादेशांनुसार राम मंदिरासाठी सुमारे अडीच हजार कोटींची देणगी जमा झालेली आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, आतापर्यंत देशभरात राम मंदिर उभारणीसाठी गोळा करण्यात येणाऱ्या देणगी मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभला. अनेक मंत्री, नेते, लोकप्रतिनिथी यांच्यापासून ते सामान्य जनतेपर्यंत अनेकांनी यथाशक्ती राम मंदिरासाठी देणग्या दिल्या असून, मुस्लिम बांधवांनीही यात उत्स्फुर्त सहभाग नोंदवल्याचे सांगितले जात आहे.







