रावेर ( प्रतिनिधी ) – येथील पंचायत समितीत झालेल्या सुमारे दीड कोटी रूपयांच्या बहुचर्चीत शौचालय घोटाळ्यात रात्री लेखाधिकार्यांसह चौघांना अटक करण्यात आली आणखी काही जण पोलिसांच्या रडारवर आहेत. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे अनेकवेळा अनुदान लाटून घोटाळ्यात सहभागी असलेल्यांचे धाबे दणाणले आहे.
शौचालय योजनेत भ्रष्ट्राचार केल्या प्रकरणी रावेर पंचायत समितीच्या वरिष्ठ सहायक लेखाधिकाऱ्यासह चार जणांना रात्री पोलिसांनी अटक केली रावेर पंचायत समितीत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गरीब कुटुंबाच्या शौचालय योजनेत तब्बल दीड कोटीच्यावर अपहार झाला होता. रावेर पोलिसात अडीच महीन्यापूर्वी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते दोघे फरार असतांना रावेर पोलिसांनी शौचालय योजनेचा तांत्रिक व मॅक्रो पध्दतीने तपास सुरु केला होता.अखेर या भ्रष्ट्राचाराला जबाबदार असलेल्या आरोपींच्या अटकसत्राला सुरुवात झाली आहे.
काल रात्री पंचायत समितीचे वरिष्ठ साहायक लेखाधिकारी लक्ष्मण दयाराम पाटील, रविंद्र रामू रायपूरे, नजीर हबीब तडवी (दोघे रा पाडळा बु) आणि बाबुराव संपत पाटील (रा विवरे बु) यांना अटक केली आहे. अनेक वेळा अनुदान लाटलेले तब्बल १२६ जण पोलिसांच्या रडारवर असुन अनुदान वर्ग करण्यात निष्काळजीपणा करणार्या पंचायत समितीच्या काही अधिकार्यांवर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे. पत्रकार कृष्णा पाटील यांच्यामुळे या शौचालय योजनेच्या भ्रष्ट्राचाराचा भांडाफोड झाला होता.रात्री केलेली कारवाई पो नि कैलास नागरे, स पो नि शितल कुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल वंजारी, विकारुद्दीन शेख, अमोल जाधव, सुकेश तडवी, सचिन घुगे, सुरेश मेढे, समाधान ठाकुर यांनी केली .
या घोटाळ्यात अनुदान लाटून अपहाराला हातभार लावणार्यांवर देखील कारवाईची शक्यता असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. सूत्रधार असलेल्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.