सातारा (वृत्तसंस्था) – सातारा येथील म्हसवे येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षाच्या मुलाचा त्याच्या अल्पवयीन मित्रानेच दगडाने ठेचून निर्घृण खून केला असल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी नऊच्या सुमारास म्हसवे येथे उघडकीस आली. गंगाराम रमेश राठोड (वय १२, रा. म्हसवे,) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गंगाराम हा मंगळवार, दि. ५ रोजी सायंकाळी घरासमोरून अचानक बेपत्ता झाला. मुलगा बराचवेळ घरी न आल्याने त्याच्या आईने त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. यामुळे आई ललिता राठोड यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान, बुधवारी सायंकाळी म्हसवडे येथील एका ऊसाच्या शेताजवळ गंगारामचा पायमोजा पडला असल्याचे त्याच्या घरातल्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ श्वानपतकास पाचारण केले. श्वान घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्याला गंगारामच्या पायमोजाचा वास देण्यात आला. श्वान धावतच उसाच्या शेतातून पलीकडच्या शेतात गेले. त्या ठिकाणी गंगारामचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.
त्या मृतदेहाशेजारी सात ते आठ दगड पडले होते. गंगारामचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. डोके, तोंड आणि छातीवर दगड मारण्यात आले आहेत. मात्र, हा खून नेमका कोणी केला, याचा पोलिसांनी तपास केल्यानंतर त्याच्यासोबत कायम असणाऱ्या त्याच्या १६ वर्षाच्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी तो घाबरल्याने त्याने खुनाची कबुली दिली. काही दिवसापूर्वी गंगाराम आणि त्याच्या मित्रामध्ये वाद झाला होता. त्यावेळी गंगारामने त्याला शिवीगाळ केली. याचा बदला म्हणून त्या मित्राने गंगारामचा खून केला.







