नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात तब्बल 34 वर्षानंतर शैक्षणिक धोरणात बदल करण्यात येणार आहे. याच शैक्षणिक धोरणावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले आहे. भविष्याचा विचार करुनच नवे शिक्षण धोरण तयार करण्यात आसे असून नव्या भारताच्या पायाभरणीसाठीच हे शिक्षण धोरण उपयुक्त असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. प्रत्येक देश आपले ध्येय लक्षात ठेऊन बदल करत पुढे जात असतो. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामागे हाच विचार असल्याचेही नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवरील बैठकीला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी नव्या शिक्षण धोरणावर आपले मत मांडले. आज देशभरात नव्या शिक्षण धोरणावर चर्चा होत आहे. वेगवेगळ्या विचारांचे लोक आपले मत मांडत आहे. शिक्षण धोरणावर मंथन करत आहेत. यावर जितकी जास्त चर्चा होईल तितका शिक्षण व्यवस्थेला फायदा होणार आहे, असे नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, देशातील कोणत्याही क्षेत्र, वर्गाकडून यामध्ये एकतर्फी निर्णय असल्याची टीका झालेली नाही. लोक वर्षांपासून सुरु असलेल्या शिक्षण धोरणात बदल अपेक्षित करत होते आणि तो पहायला मिळत आहे.







