तुळजापूर (वृत्तसंस्था) – देशात कोरोनाने हाहाकार माजवल्यानंतर टाळेबंदी घसोहित करण्यात आली होती. यावेळी मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे व सार्वजनिक स्थळे बंद करण्यात आले होते. तर, जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अन्य काही धार्मिकस्थळे मंदिरे देखील खुली करण्यात आली असताना महाराष्ट्रात मात्र प्रार्थनास्थळे अजूनही बंद ठेवण्यात आले आहेत.
त्यामुळेच, बार-रेस्टोरंट्स व इतर गोष्टी देखील सुरु करण्यात आले असताना फक्त धार्मिक स्थळेच बंद का? असा आक्रोश विरोधकांकडून केला जात आहे. वंचित बहुजन आघाडी, भाजपसह अन्य धार्मिक संघटना देखील आता राज्य सरकार विरोधात आक्रमक झाल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर कालपासून भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्त्वात तुळजाभवानी मंदिर परिसरात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु होतं.
मात्र, तुळजापुरात तुळजाभवानी मंदिर परिसरात जमावबंदी लागू केल्यामुळे पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. विभागिय दंडाधिकारी सचिन गिरी यांची स्वाक्षरी असलेली ही नोटीस बजावण्यात आली आहे. हिच नोटीस तुषार भोसले यांनाही देण्यात आली आहे. त्या नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की, जो तुळजाभवानी मंदिर परिसर आहे, तिथून 300 मीटरच्या परिघापर्यंत एकत्र जमता येणार नाही. मंदिर परिसरात जमावबंदी लागू केल्यानंतर परिसर रिकामा करण्यास सुरुवात करण्यात आली.
आमचा नवचंडीचा यज्ञ होवू दिला नाही. साधुचा तुम्हाला शाप लागेल.सर्व नियम पाळून आंदोलन करत होतो. आम्ही कुणालाही घाबरत नाही. पण भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून आंदोलन स्थगित करत आहेत, असं भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी सांगत महाविकास आघाडी सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, आंदोलन स्थळावरील मंडप प्रशासनाने काल रात्री काढून टाकला. प्रशासनाने साधू संतांना त्रास देण्यासाठी मंडप काढला तरी आज सकाळी रणचंडी यज्ञ आणि आंदोलन पुढे करणार असल्याची भूमिका आधी त्यांनी स्पष्ट केली होती. प्रशासन दबाव आणण्याचा प्रयत्न करतंय, मात्र त्याला बळी पडणार नाही, जोपर्यंत मंदीरं खुली होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. परंतु आता हे आंदोलन स्थिगित करण्यात आलं आहे.







