मुंबई (वृत्तसंस्था) – मंदिराच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच मनसेने पुन्हा एकदा मंदिराच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला घेरलं आहे. पुनश्च हरी ओम म्हणता अन् हरीलाच कोंडून ठेवता?; असा सवाल मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी केला आहे.
बाळा नांदगावकर यांनी ट्विट करून राज्य सरकारवर मंदिराच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडलं आहे. पुनश्च हरी ओम म्हणता अन् हरीलाच कोंडून ठेवता?, असा सवाल नांदगावकर यांनी केला आहे. राज्यात बार उघडले. बारची वेळही ठरवून दिली. आता जलतरण तलाव, मल्टिप्लेक्सलाही परवानगी दिली. कोरोना काय फक्त मंदिरातच होतो काय? काय तर्क असावा या मागे हे कोडेच आहे. हा केवळ भावनेचा प्रश्न नाही तर मंदिरावर अवलंबून असणाऱ्या हजारो व्यावसायिकांच्या रोजीरोटीचाही प्रश्न आहे, असं नांदगावकरांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारने गुटखा निर्मिती आणि विक्रीवर संपूर्ण देशात बंदी आणावी, अशी मागणी करतानाच महाराष्ट्र सारख्या राज्यात गुटखा विक्रीवर बंदी आहेच. परंतु तरीही राज्यात चोरट्या मार्गाने दुसऱ्या राज्यातून अनेक मार्गांनी गुटखा येत असून त्याला पायबंद घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. गुटखा सेवन करून काही लोक सार्वजनिक ठिकाणी थुंकत असतात. इतरांच्या आरोग्यासाठी हे घातक असल्यानेच देशभरातही गुटखा विक्रीवर बंदी आणा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, गुटखाबंदी असतानाही परराज्यातून येणारा अवैध गुटखा, त्याचे शालेय विद्यार्थी आणि तरुण पिढीवर होणारे गंभीर दुष्परिणाम रोखण्यासाठी संबंधित गुटखा कंपनीच्या मालकांवर तसेच अवैध व्यवसायातील सूत्रधारांवरच ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्याबाबत गांभीर्याने विचार करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच दिले होते. ज्या क्षेत्रात गुटखा आणि प्रतिबंधित खाद्यपदार्थांचा साठा किंवा वाहतूक होताना आढळून येईल. त्या ठिकाणच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या तसेच पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते.







