अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेसळखोर सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी ६ नोव्हेंबर रोजी अन्न व औषध प्रशासनाने चाळीसगावात थेट कारवाई करीत सुमरे ४ लाख रुपयांचे भेसळयुक्त तेल साठा जप्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासन जळगाव या कार्यालयामार्फत दिवाळी सणानिमित्त जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने खादयतेलाबाबत प्रशासनाने कडक धोरण अवलंबिले असून जिल्हयातील खादयतेल, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ इत्यादीवर नजर ठेवणे कामी धडक मोहीम सुरु केली आहे. त्याअनुषंगाने आज 6 नोव्हेंबर रोजी चाळीसगाव शहरातील मे. राजकुमार माणिकचंद अग्रवाल,स्टेशन रोड, चाळीसगाव येथे अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी धाड टाकली.
विक्री करिता पॅक केलेले रिफाइन्ड सोयाबीन तेलाचा नमुना घेऊन १५ लिटरचे ४९ कॅन्स व १६ बॅरल प्रत्येकी १८० किलो असा एकूण ३ लाख, ९३ हजार, ३१० एवढया किमतीचा खाद्यतेलसाठा भेसळयुक्त असल्याच्या संशयावरुन जप्त केलेला आहे.
नागरिकांनी मिठाई ,खाद्यतेल तसेच इतर अन्न पदार्थ खरेदी करण्यापूर्वी त्याचा समूह क्रमांक व उत्पादन तिथी (एक्सपायरी डेट) तपासूनच खरेदी करावेत. कुठलाही अन्न पदार्थ खरेदी करतांना विक्रेत्याकडून पक्के खरेदी बिल घ्यावे. असे आवाहन सहाय्यक आयुक्त यो. को. बेंडकुळे, अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.