जळगाव (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने औरंगाबाद येथून दुचाकी चोर जमील शेख अय्युब याला अटक केली होती. त्याच्याकडून दुचाकी विकत घेणाऱ्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली असून सर्वांना १० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जिल्ह्यात विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी झाल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी एलसीबीला तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीने तपास लावून जमील शेख अय्युब (रा. पिपळगाव, हरेश्वर, ता. पाचोरा) याला गुरुवारी अटक झाली होती. त्याच्याकडून चोरीच्या दुचाकी विकत घेणाऱ्या तिघांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये सुनील बल्लू पवार (वय-३० वर्ष), समाधान रघुनाथ हुडेकर (वय-२२ वर्ष), शेख शफिक शेख भय्या (वय-३१ वर्ष) तिन्ही राहणार जरंडी, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद यांचा समावेश आहे. जमिलकडून ८ दुचाकी ताब्यात घेतले आहे. त्याला एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहेत. एमआयडीसी पोलिसांनी चोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायमूर्ती सुवर्णा कुलकर्णी यांनी १० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.







