सातारा (वृत्तसंस्था) – मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वाेच्च न्यायलयाच्या आदेशाचे पडसाद सातारा शहरात पडल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयानंतर राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे सातारा शहरात एकच खळबळ उडाली, मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त वाढवलेला आहे.

गुरूवारी (दि. 6 मे) सकाळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा येथील निवासस्थाना बाहेर शेणीच्या गोवऱ्या पेटवल्याचा खळबळजनक प्रकार घडला. त्यानंतर लगेचच सातारा येथील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर दुपारी राष्ट्रीय काॅंग्रेसचे जिल्हा कार्यालवरही दगडफेक केली आहे.
या घटनेनंतर राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे, तेजस शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कार्यालयाच्या बाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सातारा शहरात काॅंग्रेस तसेच राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालयावर दगडफेक करण्याचा प्रकार घडला. त्यानंतर तातडीने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि आ. शिंदे यांनी कार्यालयात आले. दगडफेक करणाऱ्यांची माहीती मिळताच आ. शिंदे यांनी त्यांची भेट घेवून समज दिली. तसेच राष्ट्रवादी पक्ष आरक्षणाच्या बाजूने असून झालेला प्रकार योग्य नसून त्यांचा निषेध केला आहे.







