नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूच्या साथीविरोधातील युद्धात भारतीय रेल्वेने मोठे योगदान दिले आहे. एकीकडे, रेल्वेच्या संकटाच्या या टप्प्यात, देशभरातून ऑक्सिजन तसेच आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. तर दुसरीकडे रेल्वेने कोविड केअर कोचमध्ये 4,400 डब्यांचे रुपांतर केले आहे. रेल्वे, महाराष्ट्र, दिल्लीसह देशातील 6 राज्यांत 70,000 वेगळ्या बेड्ससह हे 4,400 कोच उपलब्ध करुन दिले आहेत. इतकेच नव्हे तर कोविड केअरचे कोच आवश्यकतेनुसार एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी सहजपणे नेले जाऊ शकतात.
रेल्वे मंत्रालयाने सांगितले की,’राज्यांनी केलेल्या मागणीनुसार 4,000 पेक्षा जास्त बेडची क्षमता असलेले 232 कोविड केअर कोच दिले गेले आहेत. हे कोविड केअर कोच कोरोना रुग्णांना सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्यांसाठी वापरले जाऊ शकतात. वाढती उष्णता पाहता या कोचमध्ये कूलर आणि जूट मॅट्सदेखील देण्यात आल्या आहेत. कोविड केअर कोचमध्ये 16 बेड्स देण्यात आले आहेत. त्याशिवाय कोचमध्ये 2 ऑक्सिजन सिलेंडर्सही देण्यात आले आहेत.
कोविड केअर कोचमध्ये आतापर्यंत 162 रुग्ण दाखल झाले आहेत. त्याच वेळी, कोरोनाच्या 96 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले आहे. आता रेल्वेने दिलेल्या या कोविड केअर कोचमध्ये 3,600 पेक्षा जास्त बेड उपलब्ध आहेत. भारतीय रेल्वेने नागालँड आणि गुजरात सरकारच्या मागणीवरुन साबरमती, चांदलोडिया आणि दिमापुरात देखील कोच तैनात केले आहेत. इतकेच नव्हे तर उत्तर प्रदेश सरकारच्या मागणीनंतर रेल्वेने राज्यात कोविड केअरचे कोच उपलब्ध करून दिले गेले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नंदुरबार स्थानकात 378 बेडच्या क्षमतेचे 21 डबे तैनात करण्यात आले आहेत.