यावल ( प्रतिनिधी ) – शहरातील २१ वर्षीय तरूणावर तिक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना रात्री घडली हा हल्ला प्रेमप्रकरणातून झाला असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
यावल शहरातील काजीपुरा भागात जावेद युनूस पटेल (वय-२१) हा तरूण कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करतो. काही दिवसांपासून त्याचे व एका महिलेचे प्रेमसंबंध होते. फैजपूर येथील अनोळखी तीन जण ५ मे रोजी रात्री जावेद याला भेटण्यासाठी आले. त्याला गोड बोलून मोटारसायकलवर बसवून घेऊन गेले भुसावळ रोडवरील पीर बाबा दर्गाजवळ जावेदवर तीन जणांनी चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. नंतर घटनास्थळाहून तीनही संशयित आरोपी फरार झाले. मध्यरात्री २ वाजता काही आदीवासींना जावेद जखमीवस्थेत पडलेला दिसून आला. त्याला यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. जावेदची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रेमप्रकरणातून हा जीवघेणा हल्ला झाला असल्याचा आरोप जखमी जावेदच्या नातेवाईकांनी केला आहे. विभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पो नि अशित कांबळे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले उशिरापर्यंत यावल पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.