औरंगाबाद (वृत्तसंस्था) – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा रद्द ठरवल्यानंतर ते पुन्हा कसं मिळवायचं, यावर राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. यासंदर्भात मराठा आरक्षण उपसमितीच्याही बैठका सुरू आहे. मात्र, त्याचवेळी मराठी आरक्षणाचा मुद्दा सुरुवातीपासून लावून धरणारे खासदार संभाजीराजे हे देखील महाराष्ट्रभर दौरे करत यासंदर्भात कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात २७ मे रोजी आपली भूमिका ते पत्रकार परिषद घेत मांडणार होते. मात्र, ही पत्रकार परिषद आता येत्या २८ मे रोजी मुंबईत घेणार आहेत.

गेल्या ३ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या विषयी मराठा क्रांती मोर्चातील समन्वयक, कार्यकर्ते, कायदेतज्ञांच्या भेटी घेत आहेत. या दौऱ्याला अभूतपुर्व प्रतिसाद लाभत आहे. बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव बैठका वाढत आहे. यामुळे दौरा लांबला आहे. अजून लोकांच्या भेटी घेणे आवश्यक असल्याने २७ तारखेला घेण्यात येणार पत्रकार परिषद २८ तारखेला घेणार आहे. यावेळी मराठी समाजाच्या भावना मी आपल्या सर्वांसमोर मांडणार असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितले आहे.
यावेळी ते असंही म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात त्यांच्या सुरू असलेल्या प्रयत्नांवर शंका घेणाऱ्यांना संभाजीराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सडेतोड शब्दांमध्ये सुनावले आहे. ‘मी काही आज येऊन टपकलो नाहीये, माझी वाटचाल २००७ सालापासूनची आहे!’ असं संभाजीराजे म्हणाले आहेत.







