जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यात खतांची विक्री करणार्या कंपनीच्या अधिकार्याने कृषी केंद्राच्या माध्यमातून माल परस्पर शेतकर्यांसह विना नोंदणीकृत कृषी केंद्रांना विक्री करुन कंपनीची १ कोटी ३० लाख रुपयात फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तीन जणांविरुद्ध आर्थीक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे येथील कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी खते विक्री करणारी कंपनी आहे.झोनल मॅनेजर वैभव कमलकिशोर राठी असून ही कंपनी नोंदणीकृत कृषी केंद्रांना खतांचा पुरवठा करते. जिल्ह्यासाठी जळगाव गोल्डन ट्रान्सपोर्टचे मालक राधेश्याम सुरजमल व्यास व नितिन मदनलाल व्यास यांच्याशी सन २०११ ते २०१८ पर्यंत करार करण्यात आला होता. मात्र जळगाव गोल्डन ट्रान्सपोर्टचे नाव बदलून राधेश्याम सुरजमल व्यास यानावाने त्यांनी नवीन फर्म सुरु केली. त्यानुसार कंपनीने २०१८ ते जून २०२१ पर्यंत करार केला होता.
कंपनीकडून आलेला माल गोडावूनमध्ये ठेवून तो ग्राहकांकडून मिळणार्या ऑर्डर नुसार त्यांना वितरीत करण्याचे काम व्यास यांचे होते. त्यांचे गोडावून आव्हाणे शिवारातील कानळदा रोडवर असून तेथूनच ते ग्राहकांना माल वितरीत करीत होते. जळगाव जिल्ह्यातील ऑर्डर घेवून त्यांना माल वितरीत करण्यासाठी कंपनीने योगेश नरेंद्र जाधव यांची नियुक्ती केली होती. जाधव हे कृषी केंद्रांकडून ऑर्डर घेवून ती ऑर्डर कंपनीला पाठवित होते. त्यानुसार कंपनी ही ऑर्डर राधेश्याम व्यास यांना पाठविल्यानंतर व्यास हा माल संबंधित व्यक्ती किंवा दुकानात पोहचवित होते. कृषी केंद्रांना हा माल मिळाल्यानंतर ट्रान्सपोर्टची पोहचपावती कंपनीला पाठवित होते. परंतु काही मालाच्या पावत्या व त्यावरील शिक्के बनावट असल्याचे कंपनीने केलेल्या पाहणीत आढळून आले होते. २०१९ मध्ये कंपनीने विकलेल्या मालाचे पैसे मुदत उलटून देखील कंपनीला मिळाले नसल्याने संबंधितांकडून कंपनीची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
कंपनीने योगेश जाधव याच्याकडे जिल्ह्यात मालाची ऑर्डर घेण्याची जबाबदारी दिली होती. परंतु त्याने बालाजी फर्टीलायझर्स डांभुर्णी या कंपनीला वितरकाला पाठविलेला माल त्याच्या कृषी केंद्राच्या माध्यमातून शेतकर्यांना परस्पर विक्री केल्याचे ईपीओएस मशिनद्वारे कंपनीला समजले आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. योगेश जाधवने वितरीत केलेला माल हा चेक स्वरुपात स्विकारुन बँकेची स्लिप भरुन ते कंपनीकडे भरल्याची पावती त्याने कंपनीला सादर केली होती.
सन २०१६ पासून आजपर्यंत राधेश्याम सुरजमल व्यास यांनी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीसोबत ट्रान्सपोर्टर म्हणून केलेला कराराच्या अटी शर्तींचा भंग करुन त्यांच्याकडे पुरवठा करण्यासाठी पाठविलेला १ कोटी ३० लाख ७७ हजार ३६९ रुपयांचा खतांचा माल योगेश नरेंद्र जाधव यांच्यामाध्यमातून परस्पर शेतकर्यांना विक्री केला. तसेच योगेशने बनावट पोहच पावत्या तयार करुन त्या खर्या असल्याचे भासवून कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी राधेश्याम सुरजमल व्यास, नितीन मदनलाल व्यास व योगेश नरेंद्र जाधव (तिघे रा. जळगाव )यांच्याविरुद्ध आर्थीक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.