जामनेर ( प्रतिनिधी ) – नेपाळची राजधानी काठमांडूतील त्रिभुवन विद्यापीठात आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय ‘इंग्लिश लैंग्वेज टीचर्स अँड अप्लाइड लिंग्विस्टिक ‘ परिषदेमध्ये पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख शंकर भामेरे यांनी शोधनिबंध सादर केला हरीभाऊ भानुदास राऊत यांनी परिषदेत सक्रिय सहभाग नोंदविला .
हा शोध निबंध २८ आणि २९ मेदरम्यान काठमांडू येथे या परिषदेत शंकर भामेरे यांनी ‘टीचिंग इंग्लिश ड्यूरिंग पेंडॅमिक सिच्युएशन ‘ या विषयावर सादर केला .
२०१९ आणि २०२० या शैक्षणिक वर्षात कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडित सुरू राहावे , या ध्येयाने शंकर भामेरे यांनी जिवाची पर्वा न करता शासकीय नियमांचे पालन करीत लेले नगर येथील हनुमान मंदिरात कुठलाही मोबदला न घेता शाळा भरविली . १८ महीने ही शाळा सुरू होती .या शाळेतून विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या अध्यापनासह कोरोना निर्मूलनासाठी सामाजिक जागृतीचे कार्य केले . टप्प्याटप्याने १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पारावरच्या शाळेचा लाभ घेतला होता .
काठमांडू येथील त्रिभुवन विद्यापिठात शंकर भामेरे यांनी या पारावरच्या शाळेचा प्रकल्प पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सादर केला . हरिभाऊ राऊत यांनी परिषदेत सहभाग नोंदविला . विद्यापीठातर्फे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा . डॉ . गोपाल पांडे , प्रा . भावना , प्रा. लीना हैद , प्रा . डॉ . जोसेफ निकोलस , डॉ . लक्ष्मण गुणवली आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले .
शंकर भामेरे यांनी बसस्थानकावर चहा विकून शिक्षण घेतले आहे . हरिभाऊ राऊत यांनी दुकानावर , शेतात मजुरी करत उच्च शिक्षण घेतले आहे . त्यांचा संघर्षमय प्रवास तरुणांना प्रेरणा देणारा आहे .
यापूर्वीही शंकर भामेरे यांनी इंडिया – बांगलादेश टेली कोलॅबोरेशन प्रोजेक्ट , इन्डो – कॅनेडियन इंटरनॅशनल कॉन्फरन्स सह विविध राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेऊन शोधनिबंध सादर केले आहेत . त्यांना शिक्षणाधिकारी डॉ . नितीन बच्छाव , शिक्षणाधिकारी विकास पाटील , तत्कालीन गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे , महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे , इंग्लिश टिचर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्रा . भरत शिरसाठ , मुख्याध्यापिका व्ही . व्ही . घोंगडे , हरिभाऊ राऊत आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले . त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे .