पुणे (वृत्तसंस्था) – स्पिरीटची तस्करी करणाऱ्या परराज्यातील एका आरोपीला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे भरारी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून 36 लाख 30 हजार 160 रुपयाची मुद्दमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मुंबई-बेंगलोर हायवेलगत असलेल्या कोळेवाडी गावच्या हद्दीत करण्यात आली आहे. प्रमोदकुमार शामसुंदर कुशावह (वय-38 रा. महोलीया, पो. धरमेर, ता.जि. देवरिया, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
स्पिरीटची तस्करी होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे पथकाला मिळाली होती. त्यानुसार कोळेवाडी येथे बनावट ग्राहक पाठवून खातरजमा करुन घेण्यात आली. त्यानंतर याठिकाणी छापा टाकण्यात आला. त्यावेळी आरोपी चालकाला टँकरच्या कॅप्सुलवर (एमएच 43 बीजी 948) चढून पाईपच्या सहायाने टँकरमधील स्पिरीट प्लास्टिकच्या बॅरलमध्ये विनापरवाना भरताना रंगेहाथ पकडण्यात आले.
त्याच्याकडून 35 लाख 50 हजार 300 रुपयाचा एक 25 हजार लिटरचा टँकर, 30 हजार 360 रुपये किंमतीचे मद्यार्कसह 200 लिटरचे तीन बॅरल, 46 रुपये किंमतीचे मद्यार्कसह 200 लिटरचे पाच बॅरल, प्लास्टिक पाईप असा एकूण 36 लाख 30 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला शुक्रवार (दि.8) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक उषा वर्मा, विभागीय उपायुक्त पुणे प्रसाद सुर्वे, अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अर्जुन पवार, समीर पाटील, उपनिरीक्षक सुरज दाबेराव, सुतार, कर्मचारी दरेकर, नाईक, शिंदे, धुर्वे, वाव्हळे, गळवे वाहन चालक कांबळे यांच्या पथकाने केली.