अमरावती (वृत्तसंस्था) – मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला भरधाव वेगात जाणाऱ्या कारची धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पोलिसाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना टोलनाक्याजवळ मंगळवारी (दि.5) सकाळी सातच्या सुमारास घडली.
विलास रामदास शेखार (वय-44 रा. अर्जुननगर) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. विलास शेखार हे मंगरुळ दस्तगीर पोलीस ठाण्यात कार्यरत असून ते अर्जुनगर परिसरात वास्तव्यास होते. मंगळवारी सकाळी जुना टोलनाक्यासमोरील रस्त्यावर मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेले होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांना जोरात धडक दिली. कारने धडक दिल्याने विलास शेखार हे गंभीर जखमी झाले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला.
कारने धडक दिल्यानंतर विलास शेखार हे बराच वेळ रस्त्यावर पडून होते. दरम्यान, मॉर्निंग वॉकला आलेल्या चांदूररेल्वे ठाण्यात कार्यरत कर्मचारी गजेंद्र ठाकरे यांना रस्त्यावर गर्दी दिसली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता त्यांना विलास हे जखमी अवस्थेत दिसून आले. त्यांना तात्काळ सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी गजेंद्र ठाकरे यांनी फिर्याद दिली असून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.