बीजिंग (वृत्तसंस्था) – चीन देशाची तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती असलेले ‘जॅक मा’ हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. अलिबाबा समूहाचे संस्थापक असलेले जॅक मा नेमके कुठे आहेत, त्यांचा ठावठिकाणा काय, असे प्रश्न जगभरातून विचारले जात आहेत. मात्र अद्याप तरी यावर चीनी सरकारनं भाष्य केलेलं नाही. ‘जॅक मा’ यांच्या बेपत्ता होण्यामागचं कारण काय. असा प्रश्न सगळ्यांना पडला असताना अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रिट जर्नलनं एक महत्त्वाचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांच्याकडे ग्राहकांची माहिती आहे. त्यांच्याकडे असलेल्या माहितीचं मोल त्यांच्या संपत्तीइतकंच मोठं आहे. चीनमधील कम्युनिस्ट सरकारला हीच माहिती मा यांच्याकडून हवी आहे. यासाठी सरकारकडून बऱ्याच कालावधीपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र मा यांनी अशा प्रकारचा तपशील देण्यास विरोध केला आहे. जॅक मा यांच्या एंट समूहाकडे कोट्यवधी ग्राहकांचा तपशील आहे. चीनमधील वित्तीय नियामक संस्थेला हा तपशील हवा आहे. त्यासाठी मा यांच्यावर बराच दबाव आणला जात आहे.
अलीबाबाच्या गुहेवर चिनी सरकारचे पहारे-चीन सरकार आणि ‘जॅक मा’ यांच्यात नक्की काय घडलं? वित्तीय नियामक संस्थेपाठोपाठ चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडूनही जॅक मा यांच्यावर ग्राहकांच्या तपशीलासाठी बराच दबाव आणला गेला. त्यामुळे मा यांच्याकडे अतिशय कमी पर्याय शिल्लक राहिले होते. ‘मा यांचं संपूर्ण लक्ष व्यवसाय वृद्धीकडे आहे. वित्तीय धोक्याच्या नियंत्रणाकडे त्यांचं फारसं लक्ष नाही. वित्तीय धोका कमी करणं देशाचं लक्ष्य आहे. मात्र याकडे मा यांचं दुर्लक्ष झालं आहे,’ अशी माहिती वॉल स्ट्रिट जर्नलनं चिनी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिलं आहे.
एंट समूह ग्राहकांच्या वैयक्तिक तपशीलाचा व्यवसायात गैरवापर करत असल्याचा चीनच्या आर्थिक नियामक संस्थेचा दावा आहे. ‘जॅक मा’ त्यांच्या अलीपे ऍपच्या मदतीनं लोकांना व्याज देतात. या माध्यमातून मध्यस्थ म्हणून मा यांच्या कंपनीला फायदा मिळतो. मात्र सगळी जोखीम बँकांना पत्करावी लागते. जवळपास ५० कोटी लोक या ऍपचा वापर करतात. या व्यक्तींच्या सवयी, उधार घेण्याची वृत्ती आणि कर्जाची परतफेड या संदर्भातील संपूर्ण तपशील ‘जॅक मा’ यांच्याकडे आहे.







