मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- फेरफार नाव लावण्यासाठी तडजोडीअंती ६ हजारांची लाच स्वीकारताना तालुक्यातील राजुरा येथील ग्रामसेवक मनोज सुर्यकांत घोडके (वय ३४) व शिपाई सचिन अशोक भोलाणकर (वय २३) यांना बुधवारी दि. १५ मे रोजी सायंकाळी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
राजुरा गावातील ४२ वर्षीय तक्रारदार यांच्या आईच्या नावाचे घर व प्लॉट असून त्यांना त्यावर आईचे नाव कमी करून तक्रारदार यांचे फेरफार नाव लावायचे होते. त्यासाठी तक्रारदाराने राजुरा ग्रामपंचायतीत अर्ज केला. तक्रारदार यांचे फेरफारवर नाव लावण्यासाठी ग्रामसेवकाने ११ हजारांची लाच दि. १५ मे रोजी मागितली होती. त्याबाबत जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवण्यात आली. बुधवारी लाच पडताळणीत ११ हजारांची लाच मागणी केल्यानंतर ग्रामसेवकाने तडजोड करीत ६ हजारांची लाच शिपायाकडे देण्याचे सांगितले. शिपायाने लाच स्वीकारताच ग्रामसेवकालाही अटक करण्यात आली. संशयीतांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एएसआय दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, प्रणेश ठाकूर, हवालदार सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे आदींच्या पथकाने यशस्वी केला.