औरंगाबाद (वृत्तसंस्था) – दिवसेंदिवस गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य गृहिणी त्रस्त झाल्या असून केंद्र सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी (दि. ६) क्रांती चौकात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ‘शेणाच्या गोवऱ्यांवर स्वयंपाक आंदोलन’ करण्यात आले. संपूर्ण राज्यभर या स्वरूपात आंदोलन झाले.
क्रांती चौक येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने चूल पेटवा आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. सर्वसामान्यांना महागाईने मोठा झटका दिलाय. गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमती जाहीर केल्या असून हे दर प्रति सिलिंडर २५ रुपयांनी वाढवण्यात आले आहे. व्यावसायिक सिलेंडरचे दर सहा रुपयांनी वाढवण्यात आलेत.
शासनाचे हे गणित सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळेच अखेर हे पाऊल उचलावे लागत असल्याचे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष छाया जंगले, विना खरे, मेहराज पटेल, संध्या शिरसाठ, सलमा बानो बेगम, विद्या ताठे, वैशाली पाटील, प्राजक्ता पाटील, कौसर बाजी, कल्पना कोहळे यांची या आंदोलनात उपस्थिती होती.







