कोलकाता (वृत्तसंस्था) – पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या परिवर्तन यात्रेला आजपासून पश्चिम बंगालमध्ये सुरुवात झाली आहे. मालदा येथे जनतेला संबोधित करताना नड्डा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका केली.
ममता दीदी ‘जय श्रीराम’ घोषणेवरून एवढ्या नाराज का होतात, असा थेट सवाल जेपी नड्डा यांनी यावेळी केला आहे. जेपी नड्डा यांचे मालदा येथे आगमन होताच जय श्रीरामांच्या घोषणा करण्यात आल्या. आगामी कालावधीत पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन जेपी नड्डा यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.
ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याची घणाघाती टीका देखील यावेळी जेपी नड्डा यांनी केली. ममता बॅनर्जी हट्टी, गर्विष्ट आणि अहंकारी आहेत. त्यामुळेच ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये शेतकरी सन्मान योजना लागू केलेली नाही. परिणामतः पश्चिम बंगालमधील सुमारे ७० लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिले, असा दावा जे.पी.नड्डा यांनी यावेळी बोलताना केला.
भाजपचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या परिवर्तन रथयात्रेच्या कालावधी तृणमूल काँग्रेसकडून जनसमर्थन यात्रा काढली जात आहे. तृणमूलची जनसमर्थन यात्रा दोन दिवस चालणार असून, शनिवारी याला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. दोन दिवसीय या दुचाकी रॅलीची सुरुवात कृष्णनगर येथून होऊन पलाशी येथे याची समाप्ती होणार आहे.
जेपी नड्डा यांच्या या परिवर्तन रथयात्रेला न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला ही यात्रा रोखण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. ०६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या रथयात्रेत ११ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कूचबिहार येथे सहभागी होणार असल्याची माहिती भाजप खासदार कैलाश विजयवर्गीय यांनी दिली.







