नवी मुंबई (वृत्तसंस्था) – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चव्हाण या कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. कराड येथील कोल्हापूर नाक्यावर आज कृषी कायद्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी रास्ता रोको करुन आंदोलकांनी आपला निषेध नोंदवला.
यावेळी पोलिसांनी चक्काजाम आंदोलन करणार्यांना ताब्यात घेतले. यामध्ये चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण यांचाही समावेश आहे. कराड पोलिसांनी सदर कारवाई केली आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी मागच्या अडीच महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. कृषी कायदे त्वरित रदद करा या मागणीसाठी आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.







