जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव महापालिकेतून वॉटरग्रेस कंपनीने कचरा व्यवस्थापनाचा ठेका घेतलेला आहे. जैविक कचरा व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, मनुष्यबळाद्वारा साफसफाई करणे या क्षेत्रात कार्यरत आहे. जळगाव, नाशिक, औरंगाबाद, मालेगाव, धुळे, मुंबई, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, दिल्ली, राँची, रायपूर, लखनौ, आणि आफ्रिका देशामध्येही युगांडा येथे कार्यरत आहे. वॉटरग्रेस कंपनी संदर्भात ठेकेदाराला पाठीशी घालणार नाही. आ. गिरीश महाजन यांचा कोणताही प्रकारचा संबंध नाही. तसेच बीएचआर. प्रकरणातही कवडीचा संबंध नसल्याची माहिती जळगाव शहराचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवारी भाजपा वसंत स्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शहरातील सागरपार्कची जागा हडप करण्यासाठी 100 कोटी रूपयांची सुपारी देण्यात आलेली आहे. ही सुपारी महाविकास आघाडी सरकारतर्फे देण्यात आली असून ही जागा आरक्षणातून वगळण्यात यावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने ही जागा महापालिकेच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट केले असले तरीही हा प्रकार होत आहे. एक वकील आणि एक महिला हे आयुक्तांवर यासाठी दबाव आणत असल्याचा गौप्यस्फोट सुध्दा राजूमामा भोळे यांनी केला.
यासोबत कोल्हे यांच्या भूखंडाच्या प्रकरणात राठी वकिलांनी कमिशन घेतले असल्याचा आरोप राजूमामा भोळे यांनी याप्रसंगी केला. राठी वकिलांची नार्को टेस्ट करण्याची मागणी सुध्दा त्यांनी केली. तर आता सुध्दा सागर पार्कच्या जागेसाठी 100 कोटी रूपयांची मागणी करण्यात येत आहे. वॉटरग्रेस प्रकरणी अनेक गावगप्पा सुरू असतांना हे प्रकरण त्यापेक्षा किती तरी पटीने मोठे असल्याचे राजूमामा भोळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महापौर भारती सोनवणे, महानगर अध्यक्ष, दिपक सुर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ. राधेशाम चौधरी, विशाल त्रिपाठी, मनोज भांडारकर आदी उपस्थित होते.