पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा येथील पीपल्स बँकेतून तत्कालीन सहायक निबंधकांनी बनावट कागदपत्रांच्या मदतीने १० लाख २० हजारांचा अपहार केल्या प्रकरणी त्यांच्यासह दोन फर्मच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा येथील दी पीपल्स बॅँकेचे सन २०११-१२ ते सन २०१५-१६ दरम्यान शहरात निवडणुकीदरम्यान सहाय्यक निबंधक प्रताप बाबा पाडवी हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त होते. त्यावेळी त्यांनी सुमारे १० लाख २० हजार रूपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रताप बाबा पाडवी यांनी जळगाव येथील आदर्श नगरमधील श्री समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स व जळगाव येथील गोलाणी मार्केटमधील कपिल प्रिंटर्सचे विलास जोगेंद्र बेंडाळे यांच्याशी संगनमत करुन बनावट दस्तावेज तयार केले. हे दस्तावेज खरे असल्याचे भासवून कपिल प्रिंटर्सच्या नावाने २ लाख ६ हजार ४२५ रुपये, समर्थ टूर ऍण्ड ट्रॅव्हल्स नावाने ४० हजार रुपये, सुपडू भादू प्राथमिक शाळेची इमारत भाड्याने दाखवून ६२ हजार २०० रुपयांचे बिल तसेच खोटे दस्तावेज व बनावट बिले दाखवून ६ लाख ५० हजार रुपये बँक खात्यातून रोखीने काढून घेतले. अशा पद्धतीने बनावट कागदपत्रे व खोटी बिले दाखवून १० लाख २० हजार ६२५ रुपयांचा अपहार केल्याची तक्रार पंकज श्रावण सोनार (पुणे) यांनी केली होती.
या संदर्भात पंकज श्रावण सोनार यांनी पाचोरा पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी यांच्यासह समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स व कपिल प्रिंटर्स यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे करत आहेत.