जळगाव (प्रतिनिधी) – रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णांशी आपुलकीने सुसंवाद साधून त्याच्या समस्या जाणून घ्याव्यात, उपचारादरम्यान रुग्णांशी प्रेमाने देखील वागायला हवे, याद्वारे रुग्ण मनमोकळेपणाने होणारा त्रास सांगेल तसेच तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे तो आयुष्यभर तुम्हाला लक्षात ठेवेल, असे प्रतिपादन गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी केले.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस उत्तीर्ण होवून नुकतीच एक बॅच इंटर्नशिपसाठी रुग्णालयात रुजु झाली आहे. त्यांना इंटर्नशिपसाठी शुभेच्छा आणि टिप्स देण्याकरीता बुधवार दि.२६ एप्रिल रोजी डॉ.केतकी हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ.उल्हास पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील हे उपस्थीत होते. त्यांच्यासमवेत व्यासपीठावर रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रमुख प्रो.डॉ.दिलीप ढेकळे, डॉ.निलेश बेंडाळे यांची उपस्थीती होती.
यावेळी अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ.उल्हास पाटील यांनी, नवोदित डॉक्टरांनी रुग्णालयात कसे वागावे, रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात चांगले संबंध कसे निर्माण करावे, रुग्णालयातील स्वच्छता तसेच इमरजन्सीमध्ये रुग्णाचा नातेवाईक औषधी आणेल यावर अवलबूंन न राहात वॉर्डात उपलब्ध औषधी देऊन उपचार सुरु करावे, प्रत्येक रुग्णाची सविस्तर हिस्ट्री, त्याला दिलेले उपचार याचे लॉग बुक तयार करावे, ज्याद्वारे भविष्यात पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेतल्यावर त्याचा उपयोग होईल अशा विविध विषयांवर डॉ.पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ.यशवर्धन काबरा, डॉ.श्रीकांत सावरकर यांच्यासह इंटर्नशिप धारक विद्यार्थी उपस्थीती होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रेरणा पाटील, राजेश पाटील यांच्यासह कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.