नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढत आहे. देशातील रूग्णांचा आकडादेखील ७ लाखांच्या घरात पोहचला आहे. कोरोना वाढीचा वेग असाच राहीला तर भारत रशियाला मागे टाकत कोरोना बाधितांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे.
भारतातील कोरोना बाधितांची संख्या ६ लाख ७३ हजार १६५ वर पोहचली आहे. तर रशियातील कोरोनाबाधीतांचा आकडा ६ लाख ७४ हजार ५१५ इतका आहे. या आकडेवारीचा विचार करता, आज भारत रशियाला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर पोहचू शकतो.
विशेष बाब म्हणजे दोन्ही देशांतील रूग्णांच्या आकडेवारीत जेमतेम दिड हजारांचं अंतर आढळून आलं आहे. लाॅकडाऊनच्या काळात कोरोनाला थोपविण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश आलं. मात्र लाॅकडाऊन शिथील झालेला असताना रूग्णांचा आकडा भयावह पद्धतीनं वाढत असल्याचं आता समोरं आलं आहे.
दरम्यान, सध्या अमेरिका व ब्राझील हे देश सर्वाधिक कोरोना बाधीत रूग्णांच्या यादीत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. भारत आता या यादीत हळूहळू चढता प्रवास करत असल्यानं नागरिकांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.







