रायगड (वृत्तसंस्था) – रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता अर्णव गोस्वामी यांच्या पत्नीलाही अटक होण्याची शक्यता आहे. आज मुंबई पोलिसांकडून अर्णव गोस्वामींच्या पत्नीला कधीही अटक होऊ शकते, अशी माहिती टीव्ही 9 मराठीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
रायगड पोलीस काल अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी अर्णव गोस्वामी यांच्यासह त्यांच्या पत्नीने रायगड पोलिसांच्या कारवाईला विरोध करून त्यांना धक्काबुक्की केली होती. त्याविरोधात रायगड पोलिसांच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानावडे यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावरूनच त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी काल अर्णव गोस्वामी यांना अटक केल्यानंतर त्याला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा अलिबाग पोलिसांनी सेशन्स कोर्टात धाव घेऊन अर्णवच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. त्यावर आज किंवा उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अर्णव यांच्या वकिलांनी त्याच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या हालचाली सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णव गोस्वामी यांना काल सकाळी मुंबई आणि रायगड पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली होती. यानंतर अर्णव गोस्वामी यांना अलिबाग येथे आणून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हापासून अर्णव यांच्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यादरम्यान अर्णव गोस्वामी यांना रुग्णालयात नेऊन त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.
अर्णव गोस्वामी यांनी दुपारच्या सत्रात अलिबाग पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचे आरोप केले होते. यावेळी त्यांनी माझ्या हाताला आणि पाठीला दुखापत झाल्याचेही अर्णव गोस्वामी यांनी म्हटले होते. मात्र, न्यायालयाने व्हिडीओ क्लिप आणि वैद्यकीय चाचणीचा अहवाल ग्राह्य धरत अर्णव गोस्वामी यांचे हे आरोप फेटाळून लावले.
याशिवाय, पोलिसांकडून अर्णव गोस्वामी यांची पत्नी आणि मुलाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा या दोघांवर आरोप ठेवण्यात आला आहे. आज सकाळी रायगड पोलिसांची टीम अर्णवच्या घरी त्याला अटक करण्यासाठी आली होती. त्यावेळी अर्णवला अटक करत असताना त्याची पत्नी आणि मुलाने पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्याला घेऊन जाऊ देत नव्हते. अर्णवला घेऊन जाण्यास त्यांनी मज्जाव केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.