मुंबई (वृत्तसंस्था) – मराठा समाजाचे आरक्षण आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. मराठा समाजातील लोकांना आरक्षित प्रवर्गात आणण्यासाठी शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला समुदाय म्हणून घोषित करता येणार नाही, असेही एससीने आपल्या निकालात स्पष्ट केले. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत मांडले आहे. गरीब मराठा समाजावर अन्याय झाला. सर्व मराठा समाज श्रीमंत नाही असं म्हणत आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
गरिब मराठा स्वत:ची पोलिटीकल आयडेंटीटी निर्माण करत नाही. जोपर्यंत गरिब मराठा श्रीमंत मराठ्यांच्या पाऊलावर पाऊल टाकून चालेल तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असं मत आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केले. गरीब मराठा समाजाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याची गरज आहे. सर्वच मराठा समाज श्रीमंत नाहीये. श्रीमंत मराठा गरिब मराठ्याला जगू देणार नाही असंही आंबेडकर यावेळी म्हणाले.
तसेच, तत्कालीन फडणवीस सरकारने दिलेलं मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरी आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. पण या विरोधात काहींनी सुप्रीम कोर्टात धाव घेत आपली याचिका दाखल केली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाला स्थागिती देण्यात आली होती. यावर आज न्या. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाणे ऐतिहासिक निकाल सुनावेला आहे.