मुंबई (वृत्तसंस्था) – आगामी काळात मनसे- शिवसेना एकत्र येणार का या प्रश्नावर बोलताना राज ठाकरेंनी परमेश्वराला ठाऊक अस मोघम उत्तर दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं, परमेश्वरावर विसंबून राहायचं नसत असा टोला राऊतांनी लगावला होता. यावर आता मनसे कडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट करुन संजय राऊतांवर निशाणा साधला. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं. संजय राऊत यांचं हे म्हणणं अगदी बरोबर आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे स्वत:चं राजकारण स्वत:च करतात. पण तुम्हाला मात्र निवडणुकीत राजकारण करण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची गरज लागते. तसेच वारंवार आमचे दैवत परमेश्वर म्हणून त्यांच्यावर विसंबून राजकारण करतात, असा टोला देखील अखिल चित्रे यांनी संजय राऊतांना लगावला आहे.