पारोळा ( प्रतिनिधी ) – पारोळ्यासाठीच्या ४५ कोटी खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे मान्यता आदेश प्राप्त झाले असून मुंबईत नगरविकास खात्याने ते दिले असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले आहे .
शहराचा पाणीप्रश्न प्रलंबित असल्याने पाण्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांना मोठ्या प्रमाणावर शहरवासियांना तोंड द्यावे लागत होते. कित्येक दशकापासून ८ ते १० दिवसांआड पाणी मिळणे, वेळेवर पाणी न येणे, वारंवार तांत्रिक अडचणींमुळे पाणी उशिराने मिळणे, गडूळ पाणी, अशुद्ध पाण्यामुळे रोगराईने शहर वासीय हैराण होते. यासाठी अनेकदा हंडा मोर्चा, आंदोलनेदेखील केली याअगोदर देखील हा प्रस्ताव शासन दरबारी गेला. मात्र त्यात अनेक त्रुट्या, अपुर्ण माहीती यामुळे त्यास मंजुरीच देण्यात आली नाही.
शुध्द पाणी व वेळेवर पाणीपुरवठा उपलब्ध करून शहराचा कायमचा पाणीप्रश्न दूर व्हावा म्हणून आमदार चिमणराव पाटील यांनी पाणीपुरवठा योजना मंजुर होण्यासाठी लागणारा विलंब, त्यांमधील त्रुटी, उद्भवणाऱ्या अडचणी याची सविस्तर माहिती घेतली. यानंतर ३ जानेवारीरोजी समन्वय समितीची बैठक आयोजित केली होती या बैठकीत पाणी पुरवठा योजना त्रुटी पूर्ततेसाठी आमदार चिमणराव पाटील यांनीउपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी यांना सूचना दिल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्तता केली व परिपूर्ण प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करून नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे आमदार चिमणराव पाटील यांनी या योजनेमुळे शहरवासियांचा कायमचाच पाणीप्रश्न सुटणार असल्याचे लक्षात आणून दिले.या प्रस्तावाची नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत आमदार चिमणराव पाटील व नगरविकास प्रधान सचिव महेश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली २५ फेब्रुवारीरोजी प्रकल्प समितीची बैठक घेत योजनेस मंजुरी देण्याचा सुचना दिल्या.
या बैठकीत एकमुखाने पारोळा शहराच्या ४५ कोटी रूपयाच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी देण्यात आली ४ मार्चरोजी आमदार चिमणराव पाटील यांना मुंबईत बोलावून पाणीपुरवठा योजनेचा प्रशासकीय मान्यता आदेश सुपुर्द करण्यात आला. शहरवासियांनी आमदार चिमणराव पाटील यांचे आभार मानले आहेत. या मंजुरीच्या अनुषंगाने आमदार चिमणराव पाटील व जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेव नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. माझे भाग्य की हे काम माझ्या वाटेला आले व शहरवासियांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मी एक भाग बनलो त्याचा मला मनस्वी आनंद असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.