जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील छत्रपती शाहू महाराज सरकारी रुग्णालयात शुक्रवारी कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. महापौर भारती सोनवणे यांनी देखील लस घेतली. जेष्ठ नागरिक आणि इतर पात्र नागरिकांना लस दिली जात आहे.

कोरोना लसीकरणाला सर्वत्र सुरुवात झाली असून मनपाच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात मोफत लसीकरणाला महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते सुरुवात झाली आहे. ६० वर्ष वयोगटावरील आणि ४५ ते ६० गटातील गंभीर आजार असलेल्या रुग्णांना लस दिली जात आहे.
दररोज २०० नागरिकांना लस दिली जाणार असून नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नोंदणी केलेल्या नागरिकांनंतर दुसरा डोस असलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. लसीकरणाला येताना नागरिकांनी ओळखीचा पुरावा आणि ४५ ते ६० वर्ष वयोगटातील नागरिकांना ओळखीचा पुरावा आणि आपल्या आजारा संदर्भातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
छत्रपती शाहू महाराज कोविड लसीकरण केंद्रात सुसज्ज प्रतीक्षा आणि नोंदणी केंद्र, लसीकरण कक्ष, निरीक्षण कक्ष तयार करण्यात आला आहे. लसीकरणानंतर नागरिकांना कोणताही त्रास झाल्यास तात्काळ उपचारासाठी बेडची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. सकाळी ९ ते दुपारी ५ पर्यंत लसीकरण केले जाणार असून नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. लसीकरण यशस्वी करण्यासाठी मनपाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी राम रावलानी यांच्यासह सर्व डॉक्टर आणि कर्मचारी परिश्रम घेत आहे.







