अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात जळगाव जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक प्रातिनिधिक स्वरूपात आज आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिनिधींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याला सुरुवात झाली. मेळाव्यात कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून अविरत योगदान देणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा प्रातिनिधिक स्वरूपात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना आणि सुभराऊ फांऊंडेशन अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्धाचे प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना केरळ, तामिळनाडू, हरियाणाच्या धर्तीवर राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना दरमहा मानधन,पेन्शन,भाऊबीज, आणि कामाच्या मोबदल्यात वाढ मिळविण्यासह अन्य प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी संघटनेची ताकद वाढवून संघटित लढा उभारणे गरजेचे आहे.असे मार्गदर्शन करताना मायाताई परमेश्वर सांगितले. कोरोनाच्या काळात आशांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोना मुक्तिसाठी दिलेले योगदान प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे.
या योगदानाची दखल घेऊन हा गौरव करण्यात येत असल्याचे सुभराऊ फांऊंडेशन अध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी बोलतांना सांगितले. संघटनेच्या आगामी आंदोलनाची माहिती अँड.गजानन थळे(मुंबई), उपाध्यक्ष युवराज बैसाणे (धुळे) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सुधीर परमेश्वर यांनी सुत्रसंचालन केले.मेळावा यशस्वी करण्यासाठी अमोल बैसाणे,संतोष पाटील,गणेश पाटील,कल्पना भोई,भागीरथी पाटील,सुनंदा पाटील,भारती तायडे,संगीता पाटील,सुनिता भोसले,भारती नेमाडे, उषा पाटील,सविता कुमावत,सुनिता चौधरी,सुनंदा हडपे यांच्यासह आदिंनी सहकार्य केले.







