नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – मानखुर्दमध्ये भीषण आग लागली आहे. मंडला परिसरात एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. धुराचे मोठे लोळ हवेत पसरताना दिसत आहे. या आगीत कोणतीही जीवितहावी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, आगीचं अत्यंत रौद्र रुप दिसत आहे. आगीला विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 14 ते 15 गाड्या दाखल झाल्या आहेत.
जिथे आग लागलीय त्या भागाला कुर्ला स्क्रॅप म्हटलं जातं. ही आग वाढत चालली आहे. आगीच्या आजूबाजूच्या परिसरात मोठी लोकवस्ती आहे. ही आग वाढू नये, यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीने प्रयत्न करत आहेत. आगीची भीषणता लक्षात घेता अग्निशमन दलाच्या जवानांनी आजूबाजूचा परिसर खाली करण्यास सुरुवात केली आहे. या परिसरात आजूबाजूला प्लॅस्टिकचेही गोदाम आहेत. आग वाढतच चालली आहे. त्यामुळे परिसरातील प्लॅस्टिकचे गोदामांनाही आग लागण्याची भीती प्रत्यक्षदर्शीनी वर्तवली आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार ही आग दुपारी दोन वाजेपासून लागली आहे. या भागात केमिकल जास्त आहे. त्यामुळे आग वाढली आहे. या गोडाऊनमध्ये केमिकल, लाकडं आहेत, अशी माहिती त्यांनी दिली
समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “मंडलाच्या मेन रोडच्या येथे एक स्क्रॅप आहे. याबाबत मी कलेक्टरकडेदेखील तक्रार केली आहे. 15 एकर जमीन ते अनधिकृतपणे वापरत आहेत. नकली तेल, नकली साबण बनवायचं काम तिथे होतं. दरवर्षी तिथे आग लागते. मी आठ वर्षांपासून विधानसभेत याबाबत तक्रार करत आहे. ही जागा मुंबईत आहे. आगीमुळे प्रदुषण होतं. चुकीचे काम रोखलं जावं. मी पर्यावरण आदित्य ठाकरे यांनादेखील याबाबत तक्रार केली. त्यांनी दखल घेतली नाही. आतादेखील आग लागली. दोन दिवस येतील आणि तिसऱ्या दिवशी लोक विसरुन जातील”, असं अबू आझमी यांनी सांगितलं.
याबाबत किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. “मी स्वत: तिथे पोहोचत आहे. आमचे तेरा ते चौदा बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. माझ्यासोबत उपमहापौर देखील तिथे येत आहेत. आजूबाजूच्या लोकांना खूप चिंता वाटते. प्रचंड धूर आहे. गोवंडी हा परिसर खूप दाटीवाटीचा आहे. नेमकं कारण आता तिथे गेल्यावरच कळेल. आगीपासून बचाव व्हावा यासाठी नियम बनवलेले आहेत. प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे”, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.







