चिमुरडीला मिळाले पुन्हा आई, वडिलांचे प्रेम, मराठा कुणबी पाटील पुनर्विवाह गु्पने केली मध्यस्थी
जळगाव (प्रतिनिधी) – खान्देश कुणबी पाटील वधू – वर सूचक मंडळ संचलित पुनर्विवाह ग्रुपच्या मध्यस्थीमुळे धुळ्यातील एका उच्च शिक्षित दांपत्याचे कौटुंबिक कलह सुटून त्यांचा घटस्फोट टळला. त्यामुळे या दांपत्याच्या अवघ्या तीन वर्षाच्या बालिकेला पुन्हा त्याच मम्मी – पप्पाचे प्रेम मिळाले. त्या दांपत्य व त्यांच्या कुटुंबियांच्या मनात काही जणांनी निर्माण केलेले गैरसमज दूर झाले. त्यामुळे या दांपत्याच्या संसाराची वेल पुन्हा बहरण्यास सुरुवात झाली असून त्यांच्या कुटुंबामध्ये आता पुन्हा आनंद निर्माण झाला आहे.
धुळे येथील डॉ.महेंद्र पाटील (मूळ रा.बाम्हणे, ता. शिंदखेडा) यांचा मुलगा शाहूराज पाटील हे बी.ई. इंजिनिअर असून ते बिल्डर म्हणून व्यावसायिक आहेत. त्यांचा विवाह भडगाव येथील बँकेतील अधिकारी किशोर दिपचंद पाटील यांची कन्या कल्याणी या बीएस्सी शिक्षण झालेल्या तरुणीशी 11 मार्च 2017 रोजी झाला. त्यांच्या संसाराच्या वेलीवर कन्यारत्न फुलले. परंतु, काही कालावधीतच काही नातेवाईकांनी त्यांच्या वैवाहिक सुखी जीवनात विष ओतण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे दांपत्य व त्यांच्या कुटुंबियांमध्ये गृहकलह वाढून तणाव निर्माण झाला. चार भिंतीमधील वाद चव्हाट्यावर येवून भडगाव येथील महिला तक्रार निवारण केंद्रात पोहचला. तेथे अनेक महिने निघून देखील तोडगा निघत नव्हता. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. जवळपास 20-25 तारखा झाल्या. कोर्टाने त्या दांपत्यास सामंजस्याने विचार करण्यास वेळ दिला. तरीही दोघांचे एकमत नव्हते. त्यांनी घटस्फोट घेण्याचा टोकाचा निर्णय घेतला. वकिलामार्फत घटस्फोटासाठी कागदपत्रांची तयारी झाली. तारखांवर तारखा झाल्या.
पुनर्विवाहासाठी मुलाचा बायोडाटा खान्देश कुणबी मराठा पाटील वधू-वर सूचक मंडळ संचलित पुनर्विवाह ग्रुपला देण्यात आला. परंतु, काही दिवसांनी ग्रुप अँडमीन भास्करराव नाना पाटील आणि राज्यस्तरिय समाजभूषण पुरस्कार प्राप्त सुमीत पाटील (वावडदा) यांनी पुढाकार घेवून या प्रकरणात मध्यस्थी करुन तडजोड करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी ते दांपत्य व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. त्यांनी दोघांमधील वाद समजून घेतला. या दोघं बाजूच्या मंडळीमध्ये काही नातेवाईकांनी ओतलेल्या विषाचे जळमट भास्करराव पाटील आणि सुमीत पाटील यांनी योग्यरित्या सर्वांचे कौन्सलिंग करुन काढले. चुकीच्या व्यक्तीशी पुनर्विवाह केलेल्या काही जणांचे वाईट अनुभव सुद्धा त्या दांपत्यासमोर कथन केले आणि “झाले गेले गंगेला मिळाले..” अशी समज देत त्यांना पुन्हा सुखा, आनंदाने नांदण्याचा मौलाचा सल्ला दिला. त्यानुसार दोघंकडील मंडळीने अवघ्या तीन वर्षांच्या बालिकेचे बालमन व तिच्याही भविष्याचा विचार केला. दोघांनी मनाचा मोठेपणा दाखवत घटस्फोटाचा निर्णय टाळून पुन्हा एकत्र येण्याचा अभिमानास्पद निर्णय घेतला. त्यामुळे चिमुरडीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि सर्वांचे मनोमिलन झाले.
हा योग जुळून आला केवळ खान्देश पुनर्विवाह ग्रुपच्या माध्यमातून…त्यामुळे सर्वांनी भास्करराव पाटील व सुमीत पाटील यांना धन्यवाद दिले.







