अयोध्या (वृत्तसंस्था) – अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराची अख्खा देश वाट पहात आहे. त्याची मुहूर्तमेढ आज भूमिपूजनाने होणार आहे. त्यामुळे अवघी अयोध्या नगरी फुलांनी आणि विद्यूत रोषणाईने झळाळून निघाली आहे.

शहरात केंद्रीय सुरक्षा दलांनी तळ ठोकला असून या पुरातन शहराला जणू लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे. अवघ्या देशांत या निमित्ताने उत्साहाचे भरते आले असून ठिकठिकाणी दीपोत्सव आणि रांगोळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे.
काय म्हणाले राज ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या सरकारने अयोध्येतील राम मंदिरासाठीची न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न केले ते निश्चितच कौतुक करण्यासाखे आहेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
ते पुढे म्हणाले, जवळपास 3 दशकांचा संघर्ष, शेकडो कारसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांच्या त्यागानंतर हा दिवस उजाडणार आहे. या क्षणी आपल्याला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते आहे, या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते. त्यांना मनापासून आनंद झाला असता, असं राज ठाकरे म्हणाले.







