जळगाव (प्रतिनिधी) – मुंबई येथील विरार येथून रेल्वेने गावाकडे निघालेल्या मजुर गर्दीमुळे रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार दि. ४ जानेवारी रोजी रात्री १ वाजेनंतर घडली आहे. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
प्रेमचंद कलफनाथ गौतम (वय ३४) रा. सिद्धार्थ नगर, लखनऊ असे जखमी मजुराचे नाव आहे. तो त्याच्या गावाकडे जाण्यासाठी शुक्रवारी विरार येथून रेल्वेत बसला. त्याच्याकडे “कन्फर्म” तिकीट नसल्याने तिकीट तपासनीस यांनी त्यास हटकले. त्यानंतर त्याला दुसऱ्या बोगीत तिकीट तपासनीस घेऊन जात होता. दरम्यान, दरवाजाजवळ मोठी गर्दी होती. तेथे त्याला कोणीतरी धक्का मारला. त्यात तो रेल्वेच्या खाली पडला, अशी माहिती त्याने दिली आहे.
त्याच्या डोक्याला दोन्ही हाताला, डाव्या पायाला जबर मार लागला आहे. प्रेमचंद गौतम हा बेशुद्ध अवस्थेत शिरसोली – कुऱ्हाडदे रेल्वे मार्गालगत पोल नं. ४०४/३१ जवळ आढळून आला. श्रीकृष्ण बारी पोलीस पाटील,शिरसोली प्र.न. यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी संबंधित पोलिस स्टेशन तसेच रेल्वे पोलिस यांना सूचित करून व्यक्तीस तत्काळ ग्रामस्थांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी हलविले.
त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार केले आहे. दरम्यान, पुढील तपास पोलीस करीत आहेत.