जळगाव (प्रतिनिधी) – इंडियन मेडिकल असोसिएशने 20 नोव्हेंबर रोजी सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने (सीसीआयएम) प्रकाशित केलेल्या राजपत्रातील अधिसूचनेचा ‘आयएमए’ने विरोध केला आहे. याच्या निषेर्धात आयएमएतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती आयएमएचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली.
सीसीआयएमच्या अधिसूचनेत एकूण 58 शस्त्रक्रिया कार्यपद्धती, जनरल सर्जरी, युरॉलॉजी, सर्जिकल गॅस्टोएंटरॉलॉजी, इ.एन.टी., ऑफ्थाल्मोलॉजी आणि डेंटिस्ट्री यांचा समावेश आहे. सीसीआयएमने या सर्व शस्त्रक्रिया आयुर्वेदातील ‘शल्यतंत्र’ आणि ‘शालाक्यतंत्र’ या नावाखाली असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या आहेत. या आयुर्वेद विद्यार्थ्यांना या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण देऊन त्याचा वापर भारतातील रुग्णांवर स्वतंत्रपणे करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. असे झाल्यास रुग्णाच्या जीवास धोका होऊ शकतो. त्यामुळे याआधिसूचनेविरुद्ध 8 डिसेंबरला आयएमए आंदोलन करणार आहे. त्यात आएमच सदस्य, एमएसएनए सदस्य, जेडीएन आणि मार्ड हे शांततामय निदर्शने करतील. यानंतर 11 डिसेंबरला सकाळी 6 ते 6 यावेळेत राज्यासह देशात वैद्यकीय सेवा बंद (आपत्कालीन सेवा वगळता) ठेवण्यात येणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
सीसीआयएमने या सर्जिकल प्रक्रियेविषयीची सूचना मागे घ्यावी, मिक्सोपॅथीला प्रोत्साहन देण्याचा विचारात असलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या सर्व समिती बरखास्त करा, केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या वैद्यकीय शाखांमध्ये आणि प्रकारांमध्ये संशोधन कार्याला प्रोत्साहन द्यायला हवे आणि त्यांचा विकास करण्याची भूमिका ठेवली पाहिजे.
याबाबत केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास आयएमए नॅशनल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करेल. तसेच सर्व आयएमए राज्य शाखा आणि स्थानिक आयएमए शाखा संबंधित जिल्हा न्यायालयांमध्ये खटले दाखल करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी डॉ.राधेश्याम चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.







