जळगाव (प्रतिनिधी) – महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापती निवडणुकीत नाट्यमय खेळी रंगल्या. भाजप व एमआयएमच्या नगरसेवकाने माघार घेतल्याने भाजप व शिंदे गटाचे विजय सोपे झाले. प्रभाग क्र.१ मध्ये भाजपने माघार घेतल्याने शिंदे गटाचे नवनाथ दारकुंडे बिनविरोध झाले आहेत तर प्रभाग क्र.२ मध्ये शिंदे गटाच्या उमेदवार रेश्मा काळे यांचा भाजपने पराभव केला. प्रभाग क्र. ३ मध्ये एमआयएमने माघार घेतल्याने तेथेही भाजपच्या अंजनाबाई सोनवणे या बिनविरोध झाल्या.
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्र.चार मध्ये भाजपचे विजय पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने ते बिनविरोध झाले होते तर प्रभाग १ ते ३ मध्ये भाजप-शिंदे गटात सरळ लढत होती. मात्र दोन ठिकाणी माघारी झाल्याने एकाच प्रभागात मतदान झाले. मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया पीठासीन अधिकारी होते. आयुक्त डॉ.विद्या गायकवाड व नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.
प्रभाग समिती सभापतीपदासाठी प्रभाग एक मध्ये शिंदे गटाचे नवनाथ विश्वनाथ दारकुंडे व भाजपचे चंद्रशेखर शिवाजी पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. प्रभाग दोन मध्ये शिंदे गटाच्या रेश्मा कुंदन काळे व भाजपच्या रंजना भरत सपकाळे यांनी तर प्रभाग तीन मध्ये भाजपच्या अंजनाबाई प्रभाकर सोनवणे व एमआयएमच्या शेख सईदा युसूफ यांनी अर्ज दाखल केला होता. या प्रभागात भाजपविरुध्द एमआयएम तर प्रभाग एक व दोन मध्ये भाजप विरुध्द शिंदे गट अशी लढत होणार होती. सोमवारी माघारीच्या दिवशी प्रभाग १ व ३ मध्ये माघारी झाल्याने या जागा बिनविरोध झाल्या तर प्रभाग दोनसाठी मतदान झाले. रेश्मा काळे यांना २ तर रंजना सपकाळे यांना ९ मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या.