जळगाव (प्रतिनिधी) – तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तीवर शहरात कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ई-आरक्षण रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करताना मिळून आल्याने रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई करीत एकास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एकूण १७ हजार ३६७ रुपयांचे नऊ तिकीट जप्त करण्यात आले आहे. रविवार, २३ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली.
नरेंद्र सुधाकर घोलप (३४, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, जळगाव) असे गुन्हा नोंदविण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक मनोज सोनी, मुख्य आरक्षण अधिकारी सुनील मराठे, विनोद जेठवे यांना जिल्हा पेठेतील प्लॉट नंबर १०१, लक्ष्मी निवास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटनजीकच्या घरात संशयास्पद युझर आयडीवरून तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन पथकाने तपासणी केली. तेथे नरेंद्र सुधाकर घोलप हा संशयास्पद स्थितीत दिसला. त्याला संशयास्पद युझर आयडीबद्दल विचारणा केली असता गेल्या दीड वर्षापासून तो स्वत:च्या मोबाइल क्रमांकाचा वापर करीत रेल्वेचे ऑनलाइन आरक्षित तिकिटांचे लॅपटॉपवरून बुकिंग करीत आहे. ज्या प्रवाशांना तिकिटांची आवश्यकता आहे, अशा प्रवाशांना तो तिकिटाच्या रकमेपेक्षा ५० ते १०० रुपये अधिक घेऊन तिकीट विक्री करीत होता. पथकाने सदर व्यक्तीला लॅपटॉपसह ताब्यात घेत आरपीएफ पोलिस ठाण्यात आणले.
घोलप याने तयार केलेल्या युझर आयडी व पासवर्डला कार्यालयीन संगणकावरून आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर तपासणी केली असताना ४ हजार ९२९ रुपये किमतीचे चार ‘लाइव्ह रेल्वे तिकीट’ व १२ हजार ४३८.३५ रुपयांचे पाच ‘फास्ट रेल्वे तिकीट’ असे एकूण १७ हजार ३६७.९५ रुपयांचे नऊ रेल्वे तिकीट असल्याचे आढळून आले. याप्रकरणी लॅपटॉप जप्त करीत नरेंद्र सुधाकर घोलपविरुद्ध रेल्वे अधिनियमनानुसार कलम १७९ (२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.