जिल्हा सत्र न्यायालयात ३५० वकिलांची आरोग्य तपासणी
गोदावरी फाऊंडेशनतर्फे हृदयरोग निदान, आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात
जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी फाऊंडेशनतर्फे मोफत हृदयरोग निदान व संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर गुरुवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी जिल्हा सत्र न्यायालय,जळगाव येथे आयोजित केले होते. या शिबिरात ३५० हून अधिक वकिलांसह स्टाफची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिरासाठी डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयातील मेडिसीन तज्ञ डॉ.तुषार पाटील, निवासी डॉ.आचल, सर्जरी विभागातील डॉ.गजानन गवळी, नेत्ररोग निवासी डॉ.नेहा, ऑर्थोचे निवासी डॉ.पियुष यांनी शिबिरार्थींची आरोग्य तपासणी केली. याशिवाय ज्यांना हृदयविकाराचा त्रास होता किंवा हृदयविकारासारखी लक्षणे किंवा शंका असलेल्या शिबिरार्थींची टू डी इको तपासणी अर्थात हृदयाची सोनोग्राफीही मोफत करण्यात आली. टू डी इको तपासणीचा रिपोर्ट हा सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ञ असलेले डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांना दाखविण्यात आला असून त्यानुसार पुढील उपचार सुचविण्यात आले.
शिबिरार्थीपैंकी काहींना विविध तपासण्या करण्यासाठी एक्स रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय याशिवाय रक्त-लघवीतील विविध तपासण्यांसाठी रुग्णालयात येण्याचा सल्ला दिला आहे. तसेच काही रुग्णांना मुतखडा, प्रोस्टेट, पित्ताशय खडे, हर्निया असे विविध आजाराची शक्यता निर्दशनास आल्याने पुढील वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात येण्याचा सल्ला दिला आहे. सोबत येतांना आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन यावे असे आवाहनही यावेळी केले. डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात लागू असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा लाभही येथे दिला जातो. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सत्र न्यायालय, जळगाव व डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील मार्केटिंग टिमचे सहकार्य लाभले.