मुख्य सुत्रधार विनोद देशमुख असल्याचा महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांचा पत्रकार परिषदेत आरोप

जळगाव (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसापासून हनी ट्रॅप प्रकरण गाजत असून यात महिलांच्या आडून जे राजकारण सुरू असल्याने त्यांविरूध्द आवाज उठविण्यासाठी राष्ट्रवादी महिला आघाडी उतरणार आहे. याप्रकरणात मुख्य सुत्रधार विनोद देशमुख असल्याने त्याला बडतर्फे करण्याची मागणी पक्षांच्या वरीष्ठाकडे करणार आहे. येत्या दोन दिवसात हनी ट्रॅप प्रकरणी पुराव्यासहीत महागौप्यस्फोट होणार असल्याची माहीती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांनी राष्ट्रवादी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
हनी ट्रॅप प्रकरणी मनोज वाणी यांनी केलेल्या आरोपाचे कल्पना पाटील यांनी खंडन करतांना सांगितले की, त्या महिलेला आर्थिक प्रलोभन दिले जात असल्याचा आरोप मनोज वाणी यांनी पत्रकार परिषद घेवून केला होता. मनोज वाणी यांनी पुराव्यासहीत महिला आघाडीसमोर यावे. मनोज वाणी यांच्या विरूध्द हनी ट्रॅप प्रकरणी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज वाणी यांनी यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहे. याप्रकरणात मुख्य सुत्रधार विनोद देशमुख असल्याचा आरोप कल्पना पाटील यांनी केला. याबाबत महिला आघाडी आवाज उठवणार असून जोपर्यंत महिलांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाहीत. याबाबत उपोषणालाही बसणार असल्याच्या त्या बोलत होत्या. यावेळी कल्पना पाटील यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्रकारांच्या उपस्थितीत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता, चाकणकर यांनी सांगितले की, आम्ही महिलांवर होणाऱ्या अन्याय संदर्भात व जळगाव महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांच्या पाठीशी उभे आहोत, असे त्यांनी सांगितले.
महिला पदाधिकार्यांचा विनोद देशमुख विरूध्द रोष
विनोद देशमुख यांनी पक्षातील अनेक महिलांना त्रास दिला असून गेल्या अनेक दिवसापासून घाणेरडे व गलीच्छ असे सोशल मिडीयाच्या माध्यमातून पोस्ट व्हायरल करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकार्यांनी विनोद देशमुख यांच्या विरूध्द पत्रकार परिषदेत रोष व्यक्त केला.
येत्या दोन दिवसात मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचेही कल्पना पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत कार्याध्यक्षा मीनल पाटील, उपाध्यक्षा मीनाक्षी चव्हाण, राष्ट्रवादी महानगरच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, उपाध्यक्षा आशा आंभोरे, माजी नगरसेविका लता मोरे, सरचिटणीस ममता तडवी, कमल पाटील, शकुंतला धर्माधिकारी आदी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
पेट्रोलियम कंपनीशी करार करून एकाला ही हॉटेल चालवायला दिली
मनोज वाणी यांनी आपल्या कुटुंबावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. यात पाटील कुटुंबाच्या मालकीच्या उमाळे घाटाच्या पायथ्याशी असणार्या टर्निंग पॉइंट या हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता असा आरोप करण्यात आला आहे. तथापि, आपण २००७ साली ही हॉटेल सुरू केली तेव्हा पेट्रोलियम कंपनीशी करार करून एकाला ही हॉटेल चालवायला दिली होती. २००९च्या निवडणुकीत आपल्याला जामनेरमधून तिकिट मिळणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर कुणी तरी या हॉटेलबाबत तक्रार केली. या अनुषंगाने पोलीस चौकशी झाली असून यात पाटील कुटुंबातील कुणाच्याही नावाचा उल्लेख नसल्याचे कल्पना पाटील यांनी स्पष्ट केले.
देहविक्रीचे प्रकरणी आरोपात दम नाही
काही दिवसांपूर्वी पिंप्राळा येथे देहविक्रीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर यातील प्रमुख आरोपी असणारी महिला ही राष्ट्रवादीची सदस्य होती हे खरे असले तरी यानंतर आम्ही स्वत: तक्रार करून याच्या चौकशीची मागणी केली. यामुळे या आरोपातही दम नाही. तर आमच्या कुटुंबाने विनोद देशमुख यांना विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप मनोज वाणी यांनी केला होता. मात्र देशमुख यांच्या विरूध्द हरीश आटोळे यांच्या तक्रारीमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून याच्याशी देखील आमचा कोणताही प्रकारचा संबंध नाही असे कल्पना पाटील म्हणाल्या.







