नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारत व चीन सीमेवर पुन्हा एकदा झटापट झाली आहे. पूर्व लडाखमधील पँगाँग तलाव परिसरात चिनी सैनिकांनी मध्यरात्री घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर देत घुसखोरीचा डाव हाणून पाडला.

चीनी कुरापतींमुळे एलएसीलगत मागील काही दिवसांपासून तणावाची स्थिती आहे. ती स्थिती निवळावी यासाठी भारत आणि चीनमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळ्यांवर विविध बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये पूर्ण सैन्य माघारीला तयार असल्याचे चीनकडून दाखवण्यात आले. मात्र, २९-३० ऑगस्टच्या मध्यरात्री चिनी सैनिकांनी पँगाँग तलाव परिसरात घुसखोरीचा प्रयत्न केला. परंतु, भारतीय जवानांनीही चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, याआधीही गलवान खोऱ्यात भारत आणि चीनी सैनिकांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. यामध्ये भारताचे २० जवान शाहिद झाले होते.







