नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – रूपे कार्ड, भीम ऍप अशा सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करण्यात आलेल्या व्यवहारांवर बॅंकांनी कोणतीही शुल्क आकारणी करू नये असा आदेश या आधीच सर्व बॅंकांना देण्यात आला आहे. त्यानुसार ज्या बॅंकांना 1 जानेवारी नंतरच्या अशा स्वरूपाच्या कोणत्याही व्यवहारावर शुल्क आकारणी केली असेल तर ती संबंधीत ग्राहकांना परत करावी असा आदेश कर विभागाने सर्व बॅंकांना दिला आहे.
यापुढे इलेक्ट्रॉनिक स्वरूपाच्या पेंमेंटवर कोणतेही शुल्क आकारू नये असा स्पष्ट आदेशही बॅंकांना देण्यात आला आहे.
सीबीडीटी म्हणजेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने या संबंधात आज एक परिपत्रक जारी केले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, युपीआय प्रणाली अंतर्गत कोणत्याही पेमेंटवर शुल्क आकारणी करता येणार नाही असे या आधीच सांगण्यात आले आहे.
केंद्र सरकारने डिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आयटी ऍक्ट मध्ये 269 एसयु या नवीन नियमाचा समावेश करून अशा शुल्क आकारणीला मनाई केली आहे. अशा स्वरूपाच्या व्यवहारावर एमडीआर चार्जेसही आकारता येणार नाहीत. काही बॅंका युपीआय प्रणालीतून झालेल्या व्यवहारांवरही काहीं प्रमाणात चार्जेस आकारत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगाने ही सुचना करण्यात आली आहे.