मुंबई (वृत्तसंस्था) – केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारने देखील १ ऑगस्टपासून नवीन नियमावली जाहीर केली आहे. ‘मिशन बिगिन अगेन’च्या पुढच्या टप्प्यात अनेक निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. मात्र दुसरीकडे राज्यात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
राज्यात सुरू होणाऱ्या मिशन बिगीन अगेनच्या पुढील टप्प्यात इनडोअर जिम, व्यायामशाळा बंदच राहणार आहेत. केवळ बाह्य (आऊटडोअर) जिम्नॅस्टिक्सना सुरक्षित अंतर आणि स्वच्छतेचे नियम पाळून ५ ऑगस्टपासून सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.
काय आहेत नवे नियम, काय झाले शिथील
५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. काही अटींवर जीम सुरू करण्यासही शासनाने अनुकूलता दर्शवली आहे. दरम्यान, जिल्हाबंदी उठवण्याबाबत मात्र सरकारने तूर्त कोणताही निर्णय घेतलेला नाही.
कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊनची यापुढेही कडक अंमलबजावणी राहणार असून बाकी भागांत देण्यात आलेल्या सवलती कायम ठेवण्यात आल्या आहेत.
तब्बल चार महिन्यांच्या कालावधीनंतर येत्या ५ ऑगस्टपासून राज्यात मॉल्स उघडणार आहेत. त्यासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मॉल खुले राहतील. मॉलमधील थीएटर्स, फूड कोर्ट्स आणि रेस्टॉरंट उघडण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. त्यातही काही प्रमाणात दिलासा देताना रेस्टॉरंट आणि फूड कोर्टचे किचन सुरू ठेवण्याची व होम डिलिव्हरीची परवानगी कायम ठेवण्यात आली आहे.
मिशन बिगिन अगेन अंतर्गत आधी देण्यात आलेल्या सर्व सवलती यापुढेही कायम राहणार आहेत. याशिवाय संघांशिवाय खेळल्या जाणाऱ्या खेळांबाबत निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यात गोल्फ, नेमबाजी, जीमनॅस्टिक, टेनिस, बॅडमिंटन, मल्लखांब या खेळांस ५ ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटेशन याचे काटेकोरपणे पालन करण्याची अट त्यासाठी घालण्यात आली आहे.
टॅक्सी व कॅबमध्ये चालक आणि ३ प्रवासी, रिक्षात चालक आणि दोन प्रवासी, चार चाकी वाहनात चालक अधिक ३ जणांना प्रवासाची मुभा आता असणार आहे. दुचाकीवर दोन जण आता जाऊ शकणार आहेत. या दोघांनीही हेल्मेट व मास्क घालणे बंधनकारक असणार आहे. सर्व प्रकारच्या प्रवासात मास्क सक्ती असेल, असेही पुढे नमूद करण्यात आले आहे.