नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने करदात्यांना सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती.यात आता आणखी वाढ करण्यात आली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर करदात्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने २०१८-१९ (असेसमेंट इयर २०१९-२०) या आर्थिक वर्षांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची तारीख ३१ जुलै वरून वाढवून ३० सप्टेंबर केली आहे. आयकर विभागाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. नवे आणि रिवाईज्ड इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख तिसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे.
करोनामुळे येणारे अडथळे आणि करदात्यांना सुलभपणे नियमांचे पालन करता यावे म्हणून २०१८-१९ (असेसमेंट इयर २०१९-२०) या आर्थिक वर्षांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवल्याचं आयकर विभागानं ट्विटद्वारे सांगितलं. सर्वात पहिल्यांदा रिटर्न दाखल करण्याची तारीख ३१ मार्च होती. त्यानंतर ही ती वाढवून ३० जून करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा ती मुदत वाढवून ३१ जुलै करण्यात आली होती आणि ती पुन्हा वाढवून ३० सप्टेंबर करण्यात आली आहे.