रत्नागिरी (वृत्तसंस्था) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बहुतेक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची अडचण वाटत असेल. म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शरद पवार यांना भेटण्याचा मार्ग दाखवला असेल, अशी मिश्किल प्रतिक्रिया महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है, असेही सत्तार यावेळी म्हणाले.
राज ठाकरे आणि राज्यपाल यांच्या भेटीवर मार्मिक भाष्य करत शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांनी राज ठाकरेंना डिवचलं. ‘शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है. शरद पवार कुठल्याही गोष्टीवर मार्ग काढू शकतात. शरद पवार शेवटच्या टोकापर्यंतचे प्रश्न सोडवतात. राजकारणातल्या प्रदीर्घ अनुभवामुळे राज्यपालांनी राज यांना पवारांच्या भेटीचा सल्ला दिल्याचा दावा अब्दुल सत्तार यांनी केला.
‘राज्यपालांशी वाढीव वीजबिलासंदर्भात चर्चा केली. राज्यपालांशी बोलल्यानंतर ते बोलले पवार साहेबांशी बोलून घ्या, मुख्यमंत्र्यांशी बोलून घ्या, पवारांना मी फोन करणार आहे’ असं राज ठाकरे यांनी काल राज्यपालांशी भेटीनंतर माध्यमांना सांगितलं होतं.
भाजपचे नेते पाठीमागून उद्धव ठाकरे यांचे कौतुक करतात, असा दावाही अब्दुल सत्तार यांनी केला. ‘उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधीच लाभला नाही. मात्र हे पुढे येऊन बोलायला भाजपचे नेते घाबरतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाजपच्या नेत्यांकडून पाठीमागून का होईना, कौतुक होतंय हे अभिमानास्पद आहे’ असंही सत्तार म्हणाले.
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेलाही सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलंय. ‘विखे पाटील विरोधी पक्ष नेते असताना राज्य आणि केंद्राची तुलना करताना केंद्राकडे बोट दाखवायचे, त्यामुळे अजून विखेंचे बोट तिकडे आहे की विखे पाटील तिकडे आहेत?’ असा सवाल सत्तार यांनी उपस्थित केला.
‘निधी देण्यासाठी आम्ही केंद्राकडे बोट दाखवतो, केंद्राने आमच्या हक्काचे पैसे द्यावे. आम्ही हक्काच्या पैशांसाठी बोट दाखवतो पण बिहारच्या निवडणुकीत कोरोनाच्या लसीचं राजकारण भाजपने केलं. ही कुठली नीतीमत्ता?’ असा सवाल अब्दुल सत्तार यांनी भाजपला विचारला.
‘केंद्र सरकारवर टीका करणे म्हणजे आपले स्वतःचे अपयश झाकायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायचे, असा हा प्रकार आहे. जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता?’, असा सवाल भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे सरकारला विचारला होता.