चोपडा (प्रतिनिधी) – तालुक्यातील वटार गावी गॅस नळी लिक झाल्याने हंडीचा भीषण स्फोट झाल्याने तीन घरें जळून खाक झाल्याची दूर्दैवी घटना सोमवार दि.२८ रोजी रात्रीच्या ८ वाजेच्या सुमारास घडली. यात दोन जण जखमी झाले असून संसारोपयोगी सामान पूर्णपणे जळून खाक झाल्याने आर्थिक प्रचंड नुकसान झाले आहे.
वटार येथील कैलास भिका कोळी यांच्या घरी रात्रीचं जेवण तयार करीत असतांना गॅस नळीने अचानक पेट घेऊन क्षणार्धात गॅस हंडीचा स्फोट झाला. घराला आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात कैलास कोळी व सरलाबाई कोळी ह्या जखमी झाल्या. त्यांना उपचारार्थ अडावद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान कैलास कोळी यांच्या घराला आग लागल्यानंतर धनसिंग खंडू कोळी, भिकुबाई सुभाष कोळी, यांच्या घरांनाही आगीने घेरले. वडगाव, सुटकार व वटार तिघेंही गावातील लोकांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्यांनतर चोपडा येथून २ व जळगाव येथून १ अग्निशमन बंबाची दाखल होऊन आग विझविण्याचे काम केले. घटनास्थळी नायब तहसीलदार सचिन भामळे, सर्कल व्हि डी पाटील, तलाठी महेंद्र पाटील, अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह पोलिस कर्मचारी तळ ठोकून होते. जि. प.सदस्य शांताराम पाटील, राकेश पाटील,मंगल इंगळे, सचिन महाजन, सरपंच गोपाल ठाकरे ,भाजप,सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.